– काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : बल्लारपूर विधानसभेसाठी भाजप व महायुतीकडून उभे असलेले राज्याचे वजनदार नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार तोफा थंडावल्या नंतर तालुक्यातील येरगाव येथे रात्री १० वाजता नंतर सभा घेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या सभेमध्ये बोलतानाचा व्हिडीओ सर्वत्र वेगाने वायरल होत असून त्यांच्या या गंभीर प्रकाराची दखल घेण्याचे धाडस कोणी करू शकेल का ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
लोकसभेमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाजपा उमेदवाराला विधानसभेतील पराभवाची कल्पना सहन होत नसल्याने अक्षरशः कायदाच पायदळी तुडवत आचार संहितेचा भंग केल्याची चर्चा आहे. खोके देऊन आमदार विकत घेता येतात हे दाखवून भाजप व महायुतीने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काळे पान जोडले होते. आता निवडणूक आयोगाचे आदेश धुडकावून आम्ही कोणालाच जुमानत नाही आणि आमचे कोणी बिघडवू शकत नाही हा जणू संदेशच भाजपाने दिला आहे. महायुतीच्या काळात कायद्याचे राज्य जिवंत असेल तर आयोगाकडून तात्काळ दखल घेतली जाऊन ताबडतोब कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रसार माध्यमातील व्हिडिओमध्ये मुनगंटीवार हे येरगाव येथील सभेत उपस्थितांशी बोलत आहेत. येरगाव येता आले नाही, पण मी शब्द दिला होता. त्यादिवशी जरी येता आले नसले तरीसुद्धा मी १८ तारखेला रात्री निश्चित येईन. साधारणतः रात्री ९-१० वाजता येईन असे होते, पण उशीर झाला. असे स्पष्टपणे बोलत असल्याचे चित्रण झालेले आहे. मुनगंटीवार यांनी आचार संहितेचा भंग करत २० तारखेला मला निवडून द्या असे आवाहन करून उपस्थितांना अनेक आश्वासने दिल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे चित्रित झालेले आहे. या गंभीर कृत्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांची उमेदवारी रद्द करावी. अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोसंबी येथे काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण –
येरगाव येथील बेकायदेशीर सभा आटोपून भाजपा उमेदवार कोसंबी येथे गेल्याची माहीती काँग्रेस कार्यकर्त्यांना होताच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी गेले व आचार संहितेचा भंग होत असून बेकायदेशीर सभा थांबविण्याची विनंती केली. तेव्हा मुनगंटीवार व भाजपच्या कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. सभा थांबविणारे तुम्ही कोण ? तुमची औकात काय ? माझी ताकद तुम्हाला माहीत नाही का ? असे म्हणून मूलचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांच्यासह राजू गावतुरे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. लोकसभेतील दारुण पराभवानंतर विधानसभेतही पराभव स्विकारावा लागू नये म्हणुन बेकायदेशीर मार्गांचा अवलंब मुनगंटीवार करीत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेस उमेदवार संतोषासिंह रावत यांनी भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे विरूध्द आचारसंहीता भंग केल्याबाबत तर वाहन चालक राजु गावतुरे यांनी अंगावर धावुन येवुन मारहाण केली व मोबाईल हिसकावुन नेल्याची तक्रार पोलीसात नोंदविली आहे. कोसंबी येथे घडलेल्या मारहाण प्रकरणाची माहीती होताच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादु काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.,आचारसंहीता भंग करणाऱ्या मुनगंटीवार विरूध्द कारवाई झालीच पाहीजे. अश्या घोषणा दिल्या. त्यामूळे पोलीस स्टेशन येथे काही काळ अशांतता पसरली. दरम्यान आतिरीक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांनी पोलीस स्टेशन येथे येवुन काँग्रेस उमेदवार संतोषसिंह रावत व सहकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पहाटे ४ वा. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन सोडले. घडलेल्या घटनेमूळे होवु घातलेल्या निवडणुकीत परिस्थिती तणावाची राहण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.