Latest Posts

कोवळी पापलेट आणि कोळंबी ताटातून गायब होणार : ५४ प्रकारचे मासे मारण्यावर निर्बंध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातल्या तमाम मत्स्यप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोवळी पापलेट आणि कोळंबी आता ताटातून गायब होणार आहे. मासळीचा दुष्काळ लक्षात घेऊन मत्स्य विभागाने मोठे पाऊल उचलले असून बोंबील, पापलेट, कोळंबी, खेकडा यासह ५४ प्रकारचे कोवळे मासे मारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हा बंदी आदेश आजपासूनच लागू करण्यात आला असून मत्स्यप्रेमींना आता महागडय़ा माशांचाच पर्याय उरणार आहे.
पारंपरिक ऐवजी ट्रॉलर, पर्सीन व इतर यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करण्याची पद्धत फोफावल्याने लहान आकाराचे मासे पकडले जाऊ लागले. त्याचबरोबरीने ९० दिवसांच्या मासेमारी बंदीचा कालावधी कमी करून तो ६१ दिवसांवर आणल्यामुळे व मासेमारी बंदीच्या काळातदेखील अवैध पद्धतीने मासेमारी सुरू राहिल्याने प्रजनन काळातील माशांची पकड होऊन माशांच्या उत्पत्तीवर परिणाम झाला होता. परिणामी गेल्या अनेक वर्षांमध्ये मत्स्य उत्पादनात सातत्याने घट होऊन मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागतोय.

केंद्राची शिफारस –
पर्सिसीन जाळी तसेच अन्य आधुनिक माध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पेंद्र सरकारने ५८ प्रजातींच्या संरक्षणासाठी राज्यांना शिफारस केली आहे. राज्य सरकारच्या मत्स्य विभागाने या शिफारशींतील ५४ प्रजातींतील कोवळ्या माशांच्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत.

– माशांच्या प्रजातींच्या रक्षणासाठी पेंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या मुंबई येथील केंद्राने महत्त्वाच्या ५८ प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानांची शिफारस केली आहे. त्यानुसार मत्स्य विभागाने ५४ प्रजातींचे किमान कायदेशीर आकारमान ठरवले असून मासेमारीवर निर्बंध घातले आहेत.
– या निर्बंधांमुळे पारंपरिक मच्छीमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळावर मात करता येईल.
– ५४ प्रकारच्या माशांच्या खरेदी आणि विक्रीसही बंदी असेल. हा आदेश मोडल्यास कारवाई होईल.

हे मासे मारण्यास मनाई –
माशांचे आकारमान मिलीमीटरमध्ये मोजले जाईल. यात पापलेट (१३५ मिमी), बोंबील (१८०), घोळ (७००), शिंगाडा (२९०), ढोमा (१६०), कुपा (३८० ते ५००) मुशी (३७५), बांगडा (११० ते २६०), हलवा (१७०), मांदेली (११५), कोळंबी (६० ते ९०) काट्याच्या लांबीच्या आधारे तुवर (५००), सुरमई (३७०) खेकडा, चिंबोरे (७० ते ९०) असे आकारमान निश्चित करून त्यापेक्षा कमी आकाराच्या माशांच्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत.

Latest Posts

Don't Miss