विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : जम्मू आणि काश्मिर सरकार हे २० ऑक्टोबर २०२४ ला काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस च्या उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यामध्ये एकूण ४२ किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि २१ किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन असे दोन भाग करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या असोसिएशनकडून मान्यता प्राप्त आहे, त्यामुळे ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय मानकानुसार मान्यता प्राप्त बनली आहे.
यामधील मॅरेथॉन विजेत्यांना यथोचित बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे. मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी २५ लाख रुपयाचे बक्षिस असून इतर विविध श्रेणींमध्ये ५६ आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. हाफ मॅरेथॉनसाठी १५ लाख रुपये बक्षिस असून ते पुरूष व महिलांच्या गटांसाठी स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.
याशिवाय मॅरेथॉन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था जम्मू आणि काश्मिर सरकारकडून करण्यात येत आहे. धावपटूंना सहभागी होण्यासाठी माहिती, नोंदणी शुल्क, धावण्याची मार्गदर्शक तत्त्वे, मार्गाचा नकाशा आणि इतर सर्व संबंधित बाबी www.kashmirmarathon.jk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून धावपटुंना या स्पर्धांमध्ये नाव नोंदणीची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२४ आहे. राज्यातील व जिल्हयातील धावपटूंनी काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस मध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.