विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २८ ऑगस्टला दुपारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
दहावीची परिक्षा १० जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. याचाच निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट ०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.