Latest Posts

अबुझमाड जंगलातील चकमकीत जहाल नक्षलवादी जोगन्ना ठार : शंभरवर गुन्हे दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : नक्षल चळवळीत सक्रिय सहभागी असलेला व शंभरवर गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी नेता व विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक (७३) हा छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलातील चकमकीत ठार झाला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली सीमेवरील चकमकीत १० नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. यातील दोघांची ओळख पटली आहे.

जोगन्ना हा बेलमपल्ली (तेलंगणा) येथील रहिवासी आहे. अल्पशिक्षित असल्याने जोगन्ना चळवळीत मोठ्या पदावर गेला नाही. परंतु प्रत्येक योजनेत त्याचा सहभाग असायचा. दक्षिण आणि उत्तर गडचिरोलीत त्याचा वावर होता. तो भूमिगत होऊन अबुझमाडमध्ये वास्तव्यास होता. अखेरच्या काळात तो  एटापल्ली, धानोरा आणि अहेरी तालुक्यात सक्रिय होता. गडचिरोलीत त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून २० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते. त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्याच्यासोबत ठार झालेला दुसरा नक्षली विनय हा नक्षल्यांचे आर्थिक नियोजन सांभाळायचा. दरम्यान, उर्वरित आठ जणांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कथित अपहरण प्रकरणात प्रमुख भूमिका –
२०१० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षल्यानी अपहरण केले होते. यात जोगन्नाची महत्त्वाची भूमिका होती. गोडसेलवार यांना नक्षल्यांनी नऊ दिवस ओलीस ठेवले होते. आर.आर. पाटील हे तेव्हा गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांनी गोडसेलवार यांच्या सुटकेसाठी यंत्रणा गतिमान केली होती. जवानांनी कोरनारच्या जंगलात नक्षल्यांच्या कॅम्प वर हल्ला केला होता. यावेळी मोठी चकमक उडाली होती. त्यात केंद्रीय समिती सदस्य भूपती व जोगन्ना बालंबाल बचावले होते.

Latest Posts

Don't Miss