Latest Posts

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ई.डी.सी. व्दारे मतदान करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ई.डी.सी.) व्‍दारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी झाली असेल व त्याच लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ई.डी.सी.) व्दारे मतदान करता येणार आहे. त्यामुळे पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ई.डी.सी.) व्दारे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ई.डी.सी. मतदानासाठी नमुना १२ अ मध्ये अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय ‍अधिकारी यांचे स्वाक्षरीने निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ई.डी.सी.) देण्यात येते. ई.डी.सी. प्राप्त मतदार त्यांना नेमण्यात येईल त्याच मतदान केंद्रातील ई.व्ही.एम. वर मतदान करता येईल. जर एखाद्या कर्मचाऱ्यास विशिष्ट मतदान केंद्र नेमून दिलेले नसेल तर अशा कर्मचाऱ्यास नजीकच्या मतदान केंद्रावर ई.डी.सी. द्वारे मतदान करता येईल.

ई.डी.सी. च्या नोंदी घेण्यासाठी प्रत्येक ई.डी.सी. ला एक युनिक नंबर देण्यात आलेला आहे. ई.डी.सी. मिळालेला अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या दिवशी त्याची प्रत मतदान केंद्रात सादर करेल. सदर मतदाराचे नाव चिन्हाकिंत यादीत शेवटी लिहिण्यात येईल. नमूना १७- अ मतदार नोंदवहीत, मतदान केंद्राध्यक्ष डायरीत व नमुना १७- सी भाग – 1 मध्ये ई.डी.सी. मतदान करणाऱ्या मतदाराची नोंद घेतली जाईल.

लोकसभा निवडणूक २०२४ पासून ८५ वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे टपाली मतदान घेण्यात आले. तसेच सेवा मतदार (Service Voters) यांचेही टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. टपाली मतपत्रिकांची मोठी संख्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार निवडणूक ‍कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांनी ४ हजार ५२० अर्ज ई.डी.सी. साठी भरून दिले आहेत.‍

ई.डी.सी. सुविधेमूळे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना त्यांना नेमूण देण्यात आलेल्या मतदान केंद्रातील ई.व्ही.एम. वर मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदान करणे सुलभ होणार असून मतदानाची टक्केवारी देखील वाढणार आहे. तसेच टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीच्या वेळेचा ताण ही काहीसा कमी होणार आहे. उमेदवारांनी देखील आपल्या मतदान प्रतिनिधींना ई.डी.सी. बाबत माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

Latest Posts

Don't Miss