Latest Posts

गो-ग्रीन योजनेत नागपूरकर आघाडीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विदर्भातील ५७ हजार ८५२ ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर करणे पूर्णपणे बंद करून केवळ ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपुरक गो-ग्रीन योजनेला प्रतिसाद दिला आहे. यात विदर्भात नागपूरकर आघाडीवर असून एकट्या नागपुरातील १७ हजारावर वीज ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडला आहे.

या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ऑनलाईनचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते गो-ग्रीन योजनेतील ग्राहकांना ई-मेल द्वारे पाठविण्यात येत आहे. एसएमएस द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागपूर परिमंडलातील २० हजार ४०८ ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत आपला सहभाग नोंदविला असून यात नागपूर शहर मंडलातील १४ हजार १७१, नागपूर ग्रामीण मंडलातील ३ हजार २०१ ग्राहक गो ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. तर वर्धा मंडलामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ई-मेल व एसएमएस ला पसंती देत पर्यावरणपुरक पर्याय स्विकारला आहे. त्याखालोखाल अकोला परिमंडलातील १४ हजार २१८, अमरावती परिमंडलातील १२ हजार ७५८, चंद्रपूर परिमंडलातील ५ हजार तर गोंदिया परिमंडलातील ५ हजार ४ ग्राहकांनी कागदविरहीत असलेला हा पर्याय स्विकारला आहे.

– बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

– असे होता येईल योजनेत सहभागी
ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss