Latest Posts

उपकेंद्राच्या इमारतीतील इलेक्ट्रिक कामात घोळ केल्याचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : मुलचेरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या वंगेनूर येथील प्राथमिक आरोग्य विभागाच्या नवीन उपकेंद्राच्या इमारतीतील ईलेक्ट्रिकच्या कामात घोळ करून काम झालेले नसतानाही बिलाची रक्कम अदा केल्याचा आरोप आनंद देविकार यांनी केला असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

या उपकेंद्राच्या ईलेक्ट्रिकचे काम पूर्ण झाले नसतानाही अभियंता तलवारे यांनी बिलाची रक्कम हेतूपुरस्परपणे काढली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या कामासंदर्भात तलवारे यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ४३ हजार ७८६ रुपये भरण्याचे पत्र देण्यात आले. त्यानुसार पैसे भरण्यात आल्यानंतरही तलवारे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून तुम्हाला माहिती देणार नाही, कुठे तक्रार करायची असेल तिथे करा, असे उर्मट उत्तर दिल्याने अखेर देविकार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात अभियंता तलवारे यांच्याशी संपर्क साधला असता, उपकेंद्राच्या ईलेक्ट्रीक कामात कोणताही घोळ करण्यात आला नाही. ईलेक्ट्रीकचे काम पूर्ण झाले होते. मात्र, उपकेंद्राच्या भिंतीवरील पुटिंग व्यवस्थित नसल्याने वरिष्ठांनी ते पुटिंगचे काम पुन्हा करण्यासाठी सांगितले. या कामादरम्यान ईलेक्ट्रिक बोर्ड व बटण खराब होऊ नये म्हणून काढून ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच बिल काढल्याचे तलवारे यांनी म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss