विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना म्हणजे ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.
भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.
खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून, ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.