Latest Posts

दीड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या : RBI बँकेच्या बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी मुंबई (Navi mumbai) : सीबीडी येथील आरबीआय मध्ये दोन हजार रुपयांचं नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडील १ लाख ६० हजाराच्या नोटा बदलण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील नोटा पळवल्या आहेत. याप्रकरणी दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दोन हजार रुपयांच्या नोटबंदी नंतर दिलेली मुदत उलटूनही आरबीआय मध्ये अद्यापही नोटा बदलून दिल्या जात आहेत. त्यामुळे सीबीडी येथील आरबीआय बाहेर नियमित सकाळी नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामध्ये बहुतांश व्यक्ती ह्या मुंबई, ठाणे परिसरातून येत असतात. अशाच प्रकारे वडाळा येथे राहणारे गोकुळ गुप्ता (७०) हे शनिवारी त्यांच्याकडील दोन हजार रुपये किमतीच्या ८० नोटा घेऊन बदलण्यासाठी आरबीआय येथे आले होते. यावेळी ते रांगेत उभे असताना एक पुरुष व महिलेसोबत त्यांची ओळख झाली.

त्यांनी गुप्ता यांना नोटा बदलून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्या स्वतकडे घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र संधी मिळताच दोघांनी तिथून पोबारा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून शनिवारी रात्री दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Latest Posts

Don't Miss