Latest Posts

रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या रूफ टॉप सोलर, योजनेला नागपूरकर ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण १.४० लाखावरील सोलर रुफ़ टॉप पैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात २४ हजार ३५७ ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवून पर्यावरणपुरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत सुरू केली आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या १ लाख ४० हजार ८०८ इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल २ हजार ५३ मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील २४ हजार ३५७ रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता २५१ मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉपच्या तुलनेत १७.२९ टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर परिमंडलाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील २ हजार ६५३ रुफ टॉप ग्राहकांसह परिमंडलातील एकूण २७ हजार १० ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली असून राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉप मध्ये नागपूर परिमंडलाचा वाटा १९.१८ टक्के आहे.

– आकडे बोलतात
सात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ १ हजार ७४ ग्राहकांकडून २० मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या १ लाख ४० हजार ८०८ इतकी झाली आहे, मागिल वर्षी ही संख्या ७६ हजार ८०८ इतकी होती. यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता १ हजार ८६० मेगावॉट होती, एकट्या नागपूर जिल्ह्यात मागिल आर्थिक वर्षात तब्बल १० हजार ९४ ग्राहकांनी ८२ मेगावॅट स्थापित वीज निर्मिती करणाऱ्या रुफ़ टॉफ संचाची स्थापना केली आहे.

– अशी आहे योजना
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देता येते, अशी ही योजना आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर मोबाईल ॲपवर नोंदणी केल्यानंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या संकेतस्थळावर जाऊन संपुर्ण प्रकिया पुर्ण करायची आहे. ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.

Latest Posts

Don't Miss