Latest Posts

महानगरपालिकेत कमिशनर नव्हे कमिशन-नर बसले

– रामाळा तलावाचे २४ कोटीचे कामही संशयाच्या भोवर्‍यात 
– भ्रष्टाचारामुळे महानगरपालिका दिवाळखोरीच्या मार्गावर : पप्पू देशमुख

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : आचारसंहितेचा भंग करून मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाचे २४ कोटीचे कंत्राट देण्यासाठी 18 मार्च रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात एकीकडे आचारसंहितेचा भंग झालेला असताना दुसरीकडे  6 दिवसात निविदा प्रक्रिया आटोपती घेऊन मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी नियम डावलल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केला.महानगरपालिकेत खुलेआम करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचारामुळे चंद्रपूर महानगरपालिका दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचा इशाराही त्यांनी दिला.विपिन पालीवाल हे कमिशनर नव्हे तर कमिशन-नर म्हणजेच फक्त कमिशन खाणारा माणूस आहे अशी टिप्पणी देशमुख यांनी केली.

२४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासाठी  घाई करण्याचे कारण काय ? : 
२४ कोटी रुपये किमतीच्या रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाच्या कामासाठी निविदा भरण्यासाठी २२ मार्च ते २७ मार्च पर्यंत फक्त ६  दिवसांचा कालावधी देण्यात आला. मनपाला हे काम करण्याची कोणतीही घाई नाही. या कामाचा कालावधी ५४० दिवसाचा म्हणजे सुमारे दीड वर्षाचा आहे. तरीही निविदा भरण्यासाठी फक्त ६ दिवसांचा वेळ देणे संशयास्पद आहे. कमिशन घेऊन विशिष्ट  काम देण्याच्या हेतूने लगबगीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असा आरोप देशमुख यांनी केला.

करोडो रुपये किंमत असलेल्या मोठ्या कामांमध्ये अशा पद्धतीने घाई करण्याची नवीन पद्धत आयुक्त पालीवाल यांनी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. याच दरम्यान कंपोस्ट डेपो वरील दोन छोट्या कामांसाठी कंत्राटदार नेमण्याच्या हेतूने १५ ते २६ मार्च पर्यंत म्हणजे १२ दिवस एवढा पर्याप्त वेळ निविदा भरण्यासाठी देण्यात आला. शहरात प्रस्तावित ई-बस डेपो बांधण्यासाठी १० कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या कामासाठी निविदा भरायला १५ मार्च ते १ एप्रिल पर्यंत म्हणजे १८ दिवस वेळ देण्यात आला.

महानगरपालिकेतर्फे भूमी अधिग्रहण करण्याचे हेतूने एजन्सी नेमण्यासाठी ११ मार्च ते २६ मार्च पर्यंत १६ दिवस वेळ निविदा भरण्यासाठी घेण्यात आला.
मात्र ५४० दिवस कामाचा कालावधी असलेल्या २४ कोटी रुपये किमतीच्या रामाळा पुनर्जीवनाच्या कामासाठी ६ दिवसांत निविदा प्रक्रिया आटोपती घेतली.

भ्रष्टाचारामुळे मनपा दिवाळखोरीच्या मार्गावर : 
महानगरपालिकेत करोडो रुपयाचे काम देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सर्वांच्या समोर खुलेआम मनपाच्या तिजोरीची लूट होत आहे. वारंवार तक्रारी करूनही मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध  कोणतीही कारवाई होत नाही. अदृश्य अघोरी शक्तींचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ मिळत असल्याने मनपाची आर्थिक स्थिती खालावली आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही मुश्किल होईल अशी मनपाची स्थिती झालेली असून लवकरच आकडेवारी सह याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती पप्पू देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

Latest Posts

Don't Miss