विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): लोकसभा निवडणूकीत विसापुर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ४५ वयोवृद्ध शासनाच्या भोंगळ कारभारामुळे मतदानापासून वंचित राहिले.
ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध होवून थकल्यामुळे काही कुटुंबीयांना ते नकोसे होतात. परिणामी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. यामुळे त्रस्त होवून सन्मानाने जगता यावे म्हणून असे नागरिक वृद्धाश्रमाचा साहारा घेतात. परंतु कुटुंबीयांबरोबर आता शासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे की, काय असे वाटू लागले आहे. कारण स्वतःचा गावापासून दूर राहत असलेल्या बऱ्याच जेष्ठ नागरिकांना यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत ईच्छा असूनही आपले मतदानाचा हक्क बजावता आला नाही व ते मतदानापासून वंचित राहिले. असा प्रसंग मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे बघायला मिळाला.
शासनाने ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली. परंतु वृद्धाश्रमात राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीच व्यवस्था किंवा सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बऱ्याच जेष्ठ नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. पुढे असे होवू नये म्हणून शासनाने यांचा सुद्धा विचार करावा. या लोकसभेच्या निवडणुकीत कुटुंबात राहत असलेल्या ज्येष्ठ वयोवृद्ध व दिव्यांग मतदाराला जशी संधी उपलब्ध करून दिली तशी यांना सुद्धा करण्याची तजवीज करावी जेणे करून हे पण मतदानाचा हक्क बजावतील व लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल.
या विषयी मातोश्री वृद्धाश्रम चे सचिव अजय जयस्वाल यांनी सांगितले की मातोश्री वृद्धाश्रमात ४५ जेष्ठ नागरिक राहतात. यामध्ये बरेच वेगवेगळ्या गावातून आले आहे. त्यांना मतदान करण्यासाठी सूचना दिल्या. परंतु गाव दूर असल्यामुळे ते जावू शकले नाही. यापुढे येथेच त्यांची मतदार नोंदणी करण्याची शासनाकडे विनंती करू.